तुळजाभवानी तुळजापूरची तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, नवरात्रात नऊ दिवस प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या माळेने भाविकांच्या श्रद्धेस आराधनेची भरती येते.नवरात्राच्या नऊ माळा असल्या तरीही तुळजाभवानीचा उत्सव तसा 21 दिवसांचा असतो. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होत असली तरीही तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीचीप्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते. वरात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते. तुळजाभवानी मातेचे स्थान बालाघाट म्हणजेच यमुनाचलावर वसलेले आहे. संरक्षणासाठी दोन्हीकडे पारंपरिक वसाहत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्थालावून मंदिराची उभारणी केली आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिर तसेच पूर्णतः खोलगट भागात असून, सुरक्षेच्या भौगोलिकदृष्ट्या तुळजाभवानी मंदिरात जाण्यासाठीउताराच्या दृष्टीने जावे लागते. मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ, तसेच अमृतकुंड म्हणजेच पूर्वीचे अंधारकुंड असे नाव प्रचलित होते.उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तुळजाभवानी मातेस पार्वतीचा अवतार समजण्यात येते. त्यामुळे गोमुख तीर्थकुंडातही महादेवाची मूर्ती आहे. त्यापाठीमागे दत्तपादुकाआहेत. त्यानंतर पहिल्यांदा कोणत्याही कार्यास सुरवात करताना गणेशदर्शन करणे हे पुराणातून सांगितले आहे. त्यामुळे गणेशदर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य रावरंभा निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत.उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या पूर्वीच्या पाच पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमांडपंती आहे.होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी रक्तभैरवाची मूर्ती आहे. तुळजाभवानीचे होमकुंड सुमारे दहा फूट लांब – रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. वर्षाला आश्विन शुद्ध दुर्गाष्टमी ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीत होमकुंड प्रज्वलित असते. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मुख्य स्थानाशिवायदेवीचा सीमोल्लंघन पार आहे. सीमोल्लंघन पाराची रचना ही अत्यंत पुरातन असून, पूर्णतः दगडी बांधकाम केलेले आहे. साधारण बारा फूट लांबी-रुंदीचा सीमोल्लंघन पार आहे. पारावर खोलगट सुपारीच्या आकाराचे छोटे छोटे खड्डे आहेत. देवीच्या सीमोल्लंघन पारावर जाण्यासाठी केवळ पश्चिम बाजूने वर जाण्यासाठी रस्ता आहे. सीमोल्लंघन पाराच्यामध्यभागी पिंपळाचे प्राचीन झाड आहे. सीमोल्लंघन पारावर सूर्योदयाचा प्रकाश येतो. त्यामुळे देवीच्या मुखावर सूर्यप्रकाश येतो. तुळजाभवानीचा मुख्य दरवाजा पितळी असून, नेपाळचा राजा परमार हा देवीचा निस्सीम भक्त होता, असा इतिहास सांगण्यात येतो. त्यामुळे तुळजाभवानीचे स्थान केवळ राज्य आणि दक्षिण भारतातल्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्यामर्यादित नव्हते, हे आजही स्पष्ट होते. पितळी दरवाजातून देवीच्या गाभाऱ्यासमोरील परिसर दिसतो. त्यानंतर देवीचे मुख्य सिंहासन आहे. देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणीगृह आहे. देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेरसभामंडपाच्या बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघराच्या स्थानात देवीचा पाळणा आणि चांदीचा पलंग आहे. पलंगाची जागा तशी मर्यादित आहे. मात्र पलंगावर असणारी गादी भव्यदिव्य आहे. देवीसमोर भवानी शंकराची मूर्ती आहे. भवानी ही पार्वतीचे रूप आहे. भवानी शंकराच्या समोरील सभामंडपात दगडी खांबावरच मंदिराची उभारणी केलीआहे. तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रात विष्णू स्थानास महत्त्व आहे. देवीच्या मंदिराकडे जाताना पुरातन ओवरीचे स्थान आहे. मंदिराप्रमाणेच खोल परिसर असून, तेथेही तीर्थकुंड आहे. या ठिकाणी आजही रहिवासी आहेत. पूर्वी तुळजाभवानीचेस्थान अनेक कडव्या धर्मविरोधकांचे लक्ष असणारे स्थान असल्याने, या ठिकाणी मंदिराप्रमाणे व तत्सम स्थान राहावे यासाठी हे स्थान निर्माण केले असून, अनेक आक्रमणांच्या वेळी देवी त्या ठिकाणी वास्तव्यास होती, असेसांगण्यात येते. मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटाचा मान घटे कुटुंबीयांचा आहे. घटे कुटुंबीय मूलतः मुरूम ता.उमरगा येथील आहे. त्यांचे वास्तव्य सोलापूर – पुणे भागात आहे. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घराची पूजा होते. देवीस दररोज दोन वेळा अभिषेक पूजा कायमस्वरूपी असतात. नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. त्यानंतर प्रशाळपूजा होते. त्यानंतर देवीस विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटोत्थापन आणि अजावळीआजही होमकुंडावर देण्यात येतो. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते. नगरचे भगत (तेली) कुटुंबीय पालखी घेऊन येतात. सुमारे 45 पिढ्यांपासून ही प्रथा चालू आहे, असे सांगण्यात येते. भिगारच्या पलंगावर देवीची पाच दिवस निद्रा असते. सार्वत्रिक सीमोल्लंघनाच्या वेळी तुळजाभवानी निद्रेत असते.त्यानंतर अश्विनी पौर्णिमेला मोठी यात्रा होते. आजपर्यंतच्या ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी तुळजापूरला अनेक दाने मातृत्वभावनेने दिली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची पुतळ्याची माळ, अहल्याबाई होळकरांची पाण्यासाठीची विहीर, हैदराबादच्या रावबहादूरसंस्थानचे कार्य कोल्हापूरच्या राजे छत्रपतीचे देवीसाठी दिलेली जमिनीची देणगी अशी अनेक नावे आहेत. आता शहरात नवीन विकास योजनेचे पर्व पुढे येऊ घातले आहे. तीनशे 15 कोटी रुपयांचा दमदार आराखडा मंजूर केला आहे. आता ही विकासाची कामे कोणत्या प्रकारे गतीने होतात, त्याकडे लक्ष लागले आहे. आराखड्यापूर्वी सरकारने प्राधिकरण केले असून, त्यासाठी सध्या सरकारी पातळीवरनियोजन चालू आहे. राज्यात तुळजाभवानी माता हे पहिले पूर्णपीठ आहे. याशिवाय माहुरची रेणुकामाता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ आहे. देवी ही सौदर्यवाहिनी आहे. भाळी गंध त्यावर सुवर्णअलंकारानेघातलेला चोप, गळ्यात वेगवेगळे दागदागिने यामुळे तुळजाभवानीचे रूप भाविकांना मोहून टाकते.
✽ श्री तुळजाभवानीचे नवरात्र ✽
अश्विन शु. प्रतिपदा ते अश्विन शु. पौर्णिमा या कालावधीत श्री तुळजाभवानी देवीचे नवरात्र असते.नवरात्र कालावधीत लाखो देविभक्त देविच्या दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात दाखल होतात.श्री देवीने अश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत महिशासूर या दैत्याचा पराभव केला त्या प्रसंगाची आठवण म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो.या उत्सवाची सुरुवात अश्विन शु. प्रतिपदापासून घटस्थापनेने होते व सांगता अश्विन शु. पौर्णिमेने होते. या कालावधीत अनेक देवीभक्त देवीचा उपवास करतात.नवरात्र कालावधीत देवीच्या पादुकांची मंदिर आवारात मिरवणूक काढली जाते.त्यास छबिना/पालखी म्हणतात.तो पालखी सोहळा
पाहण्यासाठी अनेक भक्त कवड्याची माळ धारण करून पोत ओवाळण्यासाठी मंदिरात जमा होतात.अनेक देवीभक्त नवरात्राचे नऊ दिवस उपवास पाळतात.उपासनेचे प्रकार वेगवेगळे असले तरी देवीची कृपा संपादन करणे हाच त्यामागचा हेतू आहे.
शारदीय नवरात्र
तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्राला अनन्यसाधारण महत्व असून या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते आणि हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. अश्विन प्रतिपदे पासून (सप्टेंबर-ऑक्टोबर) या शारदीय उत्सवास सुरुवात होते. त्यामागील पौराणिक कथेनुसार महिषासुर दैत्याबरोबर नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमल्याने देवी निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते. नवरात्र संपताच दहाव्या दिवशी विजयादशमीला भारतीय संस्कृतीतला मोठा सण दसरा असतो. त्या दिवशी देवी सीमोल्लंघनास बाहेर पडते. त्याचे प्रतीक म्हणून देवीची मूर्ती गाभार्यातून समारंभपूर्वक शिलंगणासाठी बाहेर काढली जाते. तो सोहळा पाहायला लक्षावधी भाविक येतात. देवीची मूर्ती पालखीत घालून प्रचंड उत्साहात वाद्यांचा गजर करीत व देवीची गाणी म्हणत जल्लोषात सीमोल्लंघनास जाते व नंतर पुन्हा मंचकी निद्राधीन होते. त्यानंतर पाच दिवसांनी, म्हणजे अश्विन शुद्ध पौर्णिमेला देवीची निद्रा संपून देवीची मूर्ती पुन्हा गाभार्यात प्रस्थापित केली जाते. अश्विन शुद्ध पौर्णिमेला (कोजागिरी पौर्णिमेला) मंदिरात देवीचा छबिना काढला जातो व त्यासाठी जवळपास १० लाख भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून व शेजारच्या कर्नाटक व आंध्र प्रदेश या प्रांतातून तुळजापुरात येतात. लक्षावधी लोक सोलापूर, उस्मानाबाद, बार्शी येथून भक्तीभावाने देवीच्या दर्शनासाठी पायी चालत येतात.
शाकंभरी नवरात्र
प्रत्येक वर्षी पौष महिन्यात (डिसेंबर/जानेवारी) शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होते. शारदीय नवरात्राच्या सोहळ्याचे वैभव पाहण्याचा योग ज्यांना येत नाही, असे भाविक शाकंभरी नवरात्राच्या सोहळ्या करिता तुळजापूरला येतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे देवस्थान संस्थानाच्या वतीने नाटक, संगीत जलसा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक ख्यातनाम गायक, वादक, व रंगमंच आणि सिनेमा क्षेत्रातील कलाकार इ. या सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. वर्ष २००९-१० मध्ये झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी रंगमंचावरील आघाडीचे कलाकार श्री प्रशांत दामले, संगीतकार श्री श्रीधर फडके व लोक गायक श्री विठ्ठल उमप यांनी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सादर केले.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महिलांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाची व कर्तृत्वाची नोंद घेण्यासाठी देवस्थान संस्थानने "श्री तुळजा स्त्री शक्ती पुरस्कार" देखील सुरू केला आहे.
देवीची निद्रा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते.उरलेले ३४४ दिवस देवी
अष्टौप्रहर जाग्रृत असते.निद्रा समयी देवीला १०८ साड्यांचे वेष्टन (दंड नेसवने)केले जाते. व विधिवत् पलंगावर निद्रेसाठी ठेवले जाते.
असे असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमेव द्वितीय आहे.देवीची मंचकी निद्रा २१ दिवसात विभागलेली आहे .मंचक याचा अर्थ पलंग असा आहे.देवी भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली आहे ती अशी -
१)घोर निद्रा :- नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वीदेवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात.या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले या मुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात.
२)श्रम निद्रा :- घोर निद्रेतुन जागी होऊन देवीने महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार झाली नऊ दिवस आसुरांसोबत युध्द केले. नवव्या दिवशी आसूर शरण आला देवीच्या चरणी स्थान मागून देवतांची माफी मागितली.
यावेळी नऊदिवस युध्दामुळे देवीला थकवा आल्याने शारदिय नवरात्रा नंतर पाच दिवसाची निद्रा घेते यालाच श्रमनिद्रा असे म्हणतात. या निद्रे साठी तुळजाभवानी चे माहेर अहमदनगराहुन पलंग येतो त्यावर आईसाहेब निद्रा घेतात या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात.
३)मोह निद्रा :-
शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी काळात देवी निद्रिस्त असते. देवीची मोह निद्रा हे स्रृजनाचे प्रतिक असुन ८ दिवस हे निद्रा काळाचे संपल्या नंतर नवमी म्हणजे तुळजाभवानी प्रकट दिवस किंवा जन्म दिवस असतो. त्या मुळे या निद्रेस मोह निद्रा म्हणतात हे नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्यांचे सुचक आहेत जसे नऊ महिन्यांनी स्रृजन होते तसाच हा कालावधी असतो.
देवी शारदीय अश्विन नवरात्रा आधी आठ दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते.
शारदीय अश्विन नवरात्रानंतर,पाच दिवस माहेरच्या चंदनाच्या,पलंगावर विश्रांती निद्रा घेते आणि शाकंभरी पौष नवरात्री दरम्यान देवी आठ दिवस चांदीच्या मंचका वर निद्रा घेते .अशा अवघ्या विश्वाचा भार सोसुन विसावा घेण्यासाठी आई गादीवर असते म्हणुन तमाम देवी भक्त तथा देवीचे आराधी या या निद्राकालात गादी ,उशी, तक्क्या यांचा त्याग करतात.उपवास धरतात.
दिवस | अलंकार | महत्व |
अश्विन शु. १ ते अश्विन शु.३ , अश्विन शु. ९ | देवीची अलंकार महापूजा | - |
अश्विन शु. ४ | रथ अलंकार महापूजा | भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला.त्या प्रसंगाची
आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा बांधली जाते. |
अश्विन शु. ५ | मुरली अलंकार महापूजा | तुळजाभवानी मातेने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देव देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या
त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली श्रीस अर्पण केली.त्यामुळे मुरली अलंकार पूजा बांधली
जाते.श्रीने मुरली वाजवील्यानंतर सर्व भयभीत देव स्वर्गप्राप्तीचा अनुभव घेऊ लागले. |
अश्विन शु. ६ | शेषशाही अलंकार महापूजा | भगवान विष्णू शेषशैयेवरती विश्राम करत असताना मातेने यांचे नेत्रकमळात विश्राम घेतला
यावेळी भगवान विष्णू यांच्या मलापासून निर्माण झालेल्या दोन दैत्यांचा वध श्री देवीने
ब्रह्मदेवाने स्तुती करून श्रीस जागविल्यानंतर भवानीने केला त्यानंतर विष्णूने आपली शैया
श्रीस अर्पण केली.त्यामुळे षष्टीस शेषशाही अलंकार पूजा बांधली जाते. |
अश्विन शु. ७ | भवानी अलंकार महापूजा | छत्रपती शिवाजी महाराज यांनी भवानीने प्रसन्न होऊन धर्मरक्षणासाठी भवानी तलवार देवून
आशीर्वाद दिले.यामुळे भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात येते. |
अश्विन शु. ८ | महिषासुरमर्दिनी अलंकार | साक्षात पार्वती असणाऱ्या जगदंबा तुळजाभवानीने दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध
केला.त्यामुळे महिषासूरमर्दिनी हा अलंकार बांधण्यात येतो.या दिवशी तुळजाभवानी मंदिरात
असणाऱ्या यज्ञ कुंडामध्ये होमहवन करून पूर्णाहुती दिली जाते.
|
अश्विन शु.९ | महानवमी | नवमीला धार्मिक विधी होतात.नवमीस घटोत्थापन केले जाते.
|
अश्विन शु.१० | विजयादशमी दसरा | उषःकाली देवीचे सीमोल्लंघन केले जाते.या दिवशी बर्हाणपूर येथून पालखी व भिंगार येथून
पलंग यांचे आगमन होते.तसेच पालखीतून मिरवणूक पार पडून देवी पलंगावर
विश्रांती(श्रमनिद्रा) घेते. |
अश्विन शु.१५ | पौर्णिमा | पौर्णिमेस देवीला महापूजा बांधण्यात येते.या दिवशी सोलापूरच्या काठ्यासह छबिना काढण्यात
येतो.या दिवशी अनेक भाविक सोलापूर पासून तुळजापूरला चालत येतात.या दिवशी नवरात्राची
सांगता होते. |
✽ नवरात्र आरती ✽
आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी हो।।
मूलमंत्रजप करूनी भोंवते रक्षक ठेवूनी हो
ब्रह्मा विष्णू रुद्र आईचें पूजन करिती हो ।।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।।
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरूनी हो
उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळूनी ।।उदो।।
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो
पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो ।।
कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो
अष्टभूजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।।उदो।।
चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी हो
उपासकां पाहसी प्रसन्न अंतकरणी हो ।।
पूर्णकृपें जगन्माते मनमोहिनी हो
भक्तांच्या माऊली सूर ते येती लोटांगणी हो ।।उदो।।
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो
अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो ।।
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो
आनंदे प्रेम तें आले सद्भावे क्रीडतां हो ।।उदो।।
षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो ।।
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो ।।उदो।।
सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो
तेथे तूं नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो ।।
जाईजुईसेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडतां झेलुनि घेता वरचेवरी ।।उदो।।
अष्टमीचे दिवशी अष्टभूजा नारायणी हो
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।।
पहिलें शरण आलों तुजलागुनी हो
स्तनपान देऊनी सुखी केले अंतकरणी ।।उदो।।
नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणें हो
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करूनी हो ।।
षड्सअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणां तृप्त केलें त्यां कृपेकरूनी हो।।उदो।।
दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो
सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबे त्वां घेऊनी हो ।।
शुभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो।।उदो।।